त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाविकाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण; गर्दीचे नियोजन करताना देवस्थान ट्रस्टची दमछाक
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – श्रावण महिना आणि सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे. याच गर्दीचे नियोजन करताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाची दमछाक झाल्याचे चित्र शनिवारी दुपारी दिसून आले. विशेषतः गर्दीचा ताण वाढल्यामुळे एका भाविकाला देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. यंदा सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखीनच वाढली आहे. गर्दीचे नियोजन सुरळीत पार पडावे, यासाठी मंदिर प्रशासनाने पिंडीचे ‘मुखदर्शन’ उत्तर दरवाजाच्या मार्गाने सुरू केले होते. मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच मुखदर्शनाची सुविधा देखील बंद करण्यात आली.
मुखदर्शन सुविधा अचानक बंद करण्यात आल्याने काही संतप्त भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. हा वाद पुढे झटापटीत आणि मग थेट मारहाणीमध्ये रूपांतरित झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार, चार ते पाच सुरक्षा रक्षकांनी एका भाविकावर बेदम हल्ला केला. या घटनेमुळे उपस्थित भाविकांमध्ये प्रचंड संताप पसरला. घटनेनंतर देवस्थान ट्रस्टने आपली बाजू मांडताना सांगितले की, संबंधित भाविकांनी मंदिराच्या दरवाजाला धक्का देत तोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रक्षकांनी हस्तक्षेप केल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. यातून ट्रस्टने अप्रत्यक्षपणे सुरक्षा रक्षकांच्या कृतीचे समर्थनच केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, श्रावण महिन्यातच नव्हे, तर दोन वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन अपुरे आणि त्रुटीपूर्ण ठरत असल्याचे स्पष्ट होते. सध्या जी गर्दी आहे, त्याच्या चार ते पाचपट गर्दी कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवरून भविष्याचा अंदाज घेतला असता, प्रशासन व ट्रस्ट यांच्यासमोरील आव्हान अधिकच कठीण होणार आहे.