दोन वर्षांपूर्वी पोलिस दलात रुजू झालेल्या २४ वर्षीय पोलिसाने भाईंदरमध्ये राहत्या घरी गळफ़ास घेत केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर – भाईंदर मध्ये एका पोलिस शिपायाने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली आहे. ऋतिक चव्हाण असे २४ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ऋतिकच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्लीत आईसह ऋतिक रहायला होता. २०२३ साली तो पोलिस दलात रुजू झाला होता. तर, भाईंदर पोलिस ठाण्यात त्याची नियुक्ती झालेली होती.
बुधवारी ऋतिकची आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी रात्री तो एकटाच घरी होता. यादरम्यान त्याने गळफास लावून घेत, आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. शेजारच्या लोकांनी ऋतिक घराबाहेर येत नसल्याने वाकून पाहिले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. ऋतिकने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास सुरू असल्याचे भाईंदर पोलिसांनी सांगितले.