चढ्या दराने मद्यविक्री करणाऱ्या १७ विक्रेत्यांना साडेआठ लाखांचा दंड
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – किरकोळ विक्री दरापेक्षा जादा दराने मद्य विक्री करणाऱ्या १७ देशी मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विक्रेत्यांना मिळून तब्बल साडेआठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जून २०२५ मध्ये मद्याच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर काही अनुज्ञप्तीधारकांकडून कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने मद्य विक्री केल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या. या तक्रारींनंतर जिल्हाभरात सर्वंकष विशेष मोहिम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच सर्वांकडून एकूण साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले की, “नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध परवाना निलंबनासोबतच कायमस्वरूपी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल. ग्राहकांची फसवणूक आणि नियमभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.” ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या कडक अंमलबजावणीचे आणि ग्राहक हक्कांच्या संरक्षणाचे एक ठोस उदाहरण ठरली आहे.