कपिल शर्माच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील सरे शहरात एक कॅफे सुरु केला आहे. कपिल शर्माच्या या कॅप्स कॅफेमध्ये महिनाभरात दोनदा गोळीबार झाला आहे. बिश्नोई गँगकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी खबरदारीचे पाऊल म्हणून कपिल शर्माला सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता कपिलच्या जीवाला धोका तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. कपिलच्या कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर मुंबईत पोलिसांनी कपिलच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती, यात त्यांना संभाव्य धोक्यांचा अंदाज आला होता. त्यामुळे आता त्याला सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या आधी कपिलला खंडणीबाबत काही विचारणा करण्यात आली आहे का? याबाबत चौकशी करण्यात आली होती, मात्र अशी कोणतीही धमकी मिळाली नसल्याची माहिती कपिलने दिली होती.
कपिलच्या कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाला होता, या दोन्ही गोळीबारांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई अलायन्स म्हणजेच गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड यांनी घेतली होती. मात्र कपिल लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर का आहे? अला प्रश्न अनेकांना पडला आहे. काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खान आणि लॉरेन्स टोळीत वाद आहे. लॉरेन्स टोळीने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचं फार्म हाऊस आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची केवळ रेकीच केली नाही तर गॅलेक्सी अपार्टमेंटवरही गोळीबार करण्यात आला, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. गेल्या काही वर्षांत अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा सलमान खानच्या खूप जवळचा झाला आहे. तो सलमानच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानला जातो. लॉरेन्स गँग आणि त्याच्या सदस्यांना हीच गोष्ट त्रास देत आहे आणि कपिल शर्माला लक्ष्य करून, लॉरेन्स गँग सलमानच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो.