नवी मुंबईत शिक्षिकेचा धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलाशी अर्धनग्न चॅटिंग; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : शिक्षक पेशाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. इथल्या एका ३५ वर्षीय महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलाशी समाजमाध्यमावरून अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ चॅटिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही शिक्षिका पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवते. तिच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेची ओळख इंस्टाग्रामवरून नवी मुंबईत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाशी झाली. पुढे त्यांचे संभाषण वाढत गेले आणि मैत्रीत रूपांतर झाले. २७ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास झालेल्या व्हिडीओ कॉलदरम्यान महिलेने अर्धनग्न अवस्थेत संवाद साधल्याचे समोर आले आहे. हे चित्रीकरण अल्पवयीन मुलाने मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते.
या प्रकाराचा उलगडा तेव्हाच झाला, जेव्हा मुलाच्या आईने त्याचा मोबाईल तपासला. त्या वेळी हे व्हिडीओ तिच्या निदर्शनास आले. मुलास खडसावून विचारणा केली असता, संपूर्ण प्रकार उघड झाला. संतप्त झालेल्या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मोबाईलची तपासणी केली. पुराव्यांची खातरजमा केल्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध पोस्को कायद्याच्या कलम ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शिक्षिकेचा थेट विद्यार्थी नाही. मात्र अशा वयाच्या मुलाशी समाजमाध्यमावरून मैत्री करून अश्लील प्रकार करणं अत्यंत गंभीर असून, समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी अद्याप फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. तसेच, सायबर पोलिसांची मदत घेऊन तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले की, “तपास पूर्ण होताच आरोपी महिलेला अटक केली जाईल. समाजमाध्यमाचा वापर करून अल्पवयीन मुलांवर मानसिक प्रभाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.”