कराड शहरात १८ वर्षीय तरुणाकडून साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
सातारा – जिल्ह्यातील कराड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षांच्या तरुणाने साडेचार वर्षांच्या मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला चांगला चोप दिला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई शेजारच्या घरी आखाडी जेवणासाठी मदत करायला गेली होती. तिने मुलीलाही सोबत नेले होते. आई कामात व्यस्त असताना मुलगी खेळायला घराबाहेर गेली. त्याचवेळी आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. रक्तस्त्राव झाल्यामुळे हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. गावात ही बातमी पसरताच लोक संतप्त झाले. त्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली.
मुलीच्या आईने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. डीवायएसपी अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मंगळवारी रात्री संशयित तरूणावर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली,” असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता कराड न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एस. वाघमोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल गोपनीय ठेवण्यात आला असून पोलीस या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करत आहेत.