“सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर स्वत:च्या लोकांवर कारवाई करा” – विधानभवनातील राड्यावर राज ठाकरेंचा संताप
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या परिसरात झालेल्या वादावादी आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वादानंतर गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या आवारात दोघांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याचे पडसाद मध्यरात्रीपर्यंत विधानभवनात उमटले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट लिहून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर सडकून टीका केली.
🔴 राज ठाकरेंच्या टीकेतील ठळक मुद्दे:
“काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?” असा संतप्त प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
“कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?” अशी उद्गार त्यांनी काढली.
वाटेल त्या लोकांना पक्षात घेतल्यामुळेच विधानभवनातला हा तमाशा घडल्याचं त्यांनी म्हटलं.
सत्ता हे “साधन आहे, साध्य नाही” याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
सत्ताधारी व विरोधक गलिच्छ भाषेत शेरेबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करत आहेत, असा आरोप.
मराठी माणसाचा अपमान झाला तर महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाहीत, असं ठाम वक्तव्य.
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हणाले की, “जर सरकारमध्ये थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा.” अन्यथा, मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकच उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला. राज ठाकरेंनी आपल्या दिवंगत आमदाराने विधानभवनात दिलेला दणका आठवून सांगितलं की, “तो वैयक्तिक द्वेष नव्हता, तर मराठीचा अपमान सहन झाला नव्हता म्हणून होता.” आणि आजची परिस्थिती त्याच्या अगदी उलट असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर राज्याच्या कारभारावर व नियंत्रणावर राजकीय स्वार्थ, गलिच्छ प्रचार आणि बेबंदशाहीने कब्जा केला असेल, तर महाराष्ट्रातील जनतेने जागं होऊन विचार केला पाहिजे की, “आपण कोणाच्या हातात महाराष्ट्र दिला आहे?”