चेंबूरमधून दोघांकडून दोन पिस्तुलं आणि काडतुसे जप्त; क्राईम ब्रँच युनिट ६ ची कारवाई
रवि निषाद / मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच युनिट ६ च्या पोलिसांनी चेंबूर परिसरातील छेडानगरमध्ये कारवाई करत दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २ पिस्तुलं व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, जीएम रोड, छेडानगर भागात दोन संशयित तरुण शस्त्रासह काही घातपात करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत. या माहितीवर विश्वास ठेवत युनिट ६ चे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये राजेश कुमार महेंद्र कुंभार उर्फ गुडडू व अमित सुदीर शर्मा या दोघांचा समावेश आहे. दोघेही उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुलं आणि दोन थेट जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
प्राथमिक तपासात उघड झालं आहे की, हे दोघे कोणावर तरी प्राणघातक हल्ला करण्याच्या हेतूने मुंबईत आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. यासंदर्भात त्यांची कसून चौकशी सुरू असून, शस्त्र पुरवठा साखळी, उद्दिष्ट व्यक्ती आणि पृष्ठभूमी यांचा तपास केला जात आहे. या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. क्राईम ब्रँच युनिट ६च्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.