पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी १५ लाख रुपयांची बनावट दारू जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात ड्रग्स तस्करीची वाढतं प्रमाण चिंता वाढवणारं आहे. पुण्यात मोठ्या संख्येने तरुणाई शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी येत असते. यादरम्यान पुण्यातून अमली पदार्थाचा साठा सापडल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे. अशातच पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करीत एक कोटी १५ लाख रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. गोव्यातून तस्करी करुन आणण्यात येत असलेल्या १ कोटी १५ लाखांच्या ५७ हजार ७८२ बाटल्या दारु उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेत. जेजुरी सासवड रोडवरील वीर फाटा येथे केलेल्या कारवाईत सहा चाकी कंटेनरमधील तब्बल १२०४ बॉक्समधील ५७ हजार ७९२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंटेनर, मोबाईल असा १ कोटी ३३ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अधीक्षक अतुल कानडे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार ११ जुलै रोजी दुपारी चार वाजता सासवड येथील जेजुरी – सासवड रोडवरील वीर फाटा येथे सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी संशयित एलपीटी सहा चाकी कंटेनर वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीचा विदेशी दारुचा माल आढळून आला.