पंतनगर पोलिसांच्या ‘मोबाईल मिसिंग स्टाप’ची उल्लेखनीय कामगिरी; ६ महिन्यांत १०० हून अधिक मोबाईल्स परत
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष गीध यांचा सायबर कौशल्याने प्रभावित; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
रवि निषाद / मुंबई
मुंबई – घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यांत कार्यरत असलेल्या ‘मोबाईल मिसिंग स्टाप’ युनिटने अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल काही तासांत शोधून मूळ मालकाकडे पोहचवण्याचे यशस्वी कार्य या युनिटने पार पाडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून पंतनगर पोलिस ठाण्याचे खास कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ ७ मधील पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवळे यांच्या नेतृत्वाखाली मोबाईल मिसिंग स्टॉप युनिट कार्यरत आहे. या युनिटचे पोलिस कर्मचारी संतोष गीध हे एक कुशल सायबर एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की संबंधित व्यक्ती पोलिस ठाण्यात तक्रार करताच, संतोष गीध तात्काळ तांत्रिक आणि मानवी स्रोतांचा वापर करून मोबाईल ट्रॅक करतात आणि पीडिताला परत देण्याची प्रक्रिया सुरू करतात.
मागील सहा महिन्यांत या युनिटने १०० हून अधिक मोबाईल फोन्स शोधून त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत. हे सर्व कार्य वरिष्ठ निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले गेले आहे. अलीकडील घटनेत, एका युवकाचा मोबाईल हरवल्यानंतर तो एका व्यक्तीस सापडला आणि सदर व्यक्तीने प्रामाणिकपणे तो पंतनगर पोलिस स्टेशनमध्ये जमा केला. यानंतर पोलीस कर्मचारी संतोष गीध आणि महिला उपनिरीक्षक मैना चट यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मोबाईल मूळ मालकाला सुपूर्त करण्यात आला. मालक व त्यांच्या कुटुंबीयांनी पंतनगर पोलिस ठाण्याचे विशेष आभार मानले असून, अशा पारदर्शक आणि तत्पर कार्यामुळे पोलिस दलाबद्दलचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.