एआय च्या फसवणुकीचा नवा फंडा : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून ७८ लाखांचा गंडा

Spread the love

एआय च्या फसवणुकीचा नवा फंडा : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरून ७८ लाखांचा गंडा

पोलीस महानगर नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर – सायबर गुन्हेगारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडवला आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा आणि रूप वापरून एका ७७ वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल ७८ लाख ६० हजारांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात ९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.

व्हिडीओ कॉलद्वारे विश्वास संपादनाचा प्रयत्न

२ जुलै २०२५ रोजी, सेवानिवृत्त अधिकारी यांना पोलीस वर्दीतील व्यक्तीकडून व्हिडीओ कॉल आला. “संजय पिसे” असे भासवून, आपण विश्वास नांगरे पाटील यांचे सहकारी आहोत, असे सांगण्यात आले. त्यानंतर पीडित अधिकाऱ्याला सांगण्यात आले की, तुमच्या पत्नीच्या खात्यात २ कोटींचा संशयास्पद व्यवहार झाला आहे, ज्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलामशी आहे.

तुमच्याविरुद्ध एनआयए कडून गुन्हा दाखल होणार असून अटक होऊ शकते, असा धाक दाखवण्यात आला. पुढे त्या व्यक्तीने थेट “नांगरे पाटील” यांच्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीद्वारे व्हिडीओ कॉल करून विश्वास निर्माण केला. सतत दबाव आणि भीती निर्माण करत सहा दिवसांत विविध बँक खात्यांमध्ये एकूण ७८ लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले गेले. पीडितांना शेवटी आपल्या फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे व्हिडीओ कॉल किंवा धमकावणारे फोन आल्यास घाबरून जाऊ नये, आणि तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

फसवणूक करणाऱ्याने एआय द्वारे नांगरे पाटील यांच्यासारखा चेहरा तयार केला. फसवणुकीची रक्कम: ७८.६० लाख रुपये. संबंधित तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल. सेवानिवृत्त अधिकारी हे विभागीय आयुक्तालयातून निवृत्त. ही घटना सायबर गुन्हेगारीच्या बदललेल्या स्वरूपाचे भीषण उदाहरण आहे. नागरिकांनी अशा क्लृप्त्यांना बळी न पडता सतर्क राहण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon