स्मशानभूमीत अघोरी पूजा करताना दोघे गजाआड; लिंबू, काळा कपडा व महिलांचे फोटो वापरून जादूटोण्याचा प्रयत्न
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – तालुक्यातील पिंपळास गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा करून जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबीर दिलीप चौधरी व निखील संतोष पाटील अशी आरोपींची नावे असून, त्यांनी काळा कपडा, लिंबू आणि अनोळखी महिलांचे फोटो वापरून अमानवी कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जूनच्या मध्यरात्री ते ४ जुलै दरम्यान या दोघांनी गावातील स्मशानभूमीत दोन अनोळखी महिलांचे फोटो लिंबूंवर चिकटवले. हे लिंबू काळ्या कापडात गुंडाळून स्मशानभूमीत ठेवण्यात आले होते. हे कृत्य जादूटोणा करून संबंधित महिलांच्या जीवाला धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळताच ग्रामपोलिस पाटील अशोक उमाकांत जाधव यांनी कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) आणि ३(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड करत आहेत. गावात या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.