ठाकरे बंधूंची ऐतिहासिक भेट! पण युतीवर संभ्रम कायम – राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना ‘मौन’ आदेश
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – ५ जुलै रोजी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याची ऐतिहासिक घटना घडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. “एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भाषणातून मनसेसोबत युतीबाबतची तीव्र इच्छा स्पष्टपणे उमटली. मात्र, राज ठाकरे यांनी मात्र अधिक सावध आणि संयमित भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी युती संदर्भात कोणत्याही अधिकृत घोषणेस नकार दिला असून, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, “युतीबाबत कोणीही बोलू नये. कुणीही यावर भाष्य करायचं असल्यास आधी माझी परवानगी घ्यावी.” या आदेशामुळे दोन्ही पक्षांच्या युतीबाबत पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मेळाव्यानंतर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे समोर आला आणि राज ठाकरे यांनीही मराठी माणसांची एकजूट आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होण्याची भावना व्यक्त केली. मात्र, युती बाबत त्यांनी कोणताही स्पष्ट संकेत दिला नाही. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भावनिक अपील करताना म्हटलं, “मराठी माणूस एकत्र यावा, हेच आमचं ध्येय आहे.” पण हे एकत्र येणं केवळ मंचापुरतं मर्यादित राहणार की ते निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतरही टिकणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मराठी अस्मिता आणि एकजुटीच्या भावनेतून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी राज ठाकरे यांनी युतीबाबत जाणीवपूर्वक स्पष्टता टाळल्याने, ही युती प्रत्यक्षात येईल की नाही, हे अजूनही अनिश्चित आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांत ‘संभाव्य युती’ या संकल्पनेभोवती गोंधळाचे वातावरण आहे. पुढील काळात राज ठाकरे कोणती भूमिका घेतात, यावरच हे समीकरण ठरणार आहे.