घरांची स्वप्नं दाखवून कोट्यवधींची फसवणूक; एमएमआरडीए अधिकारी असल्याची बनवाबनवी, दोन महिलांवर गुन्हा

Spread the love

घरांची स्वप्नं दाखवून कोट्यवधींची फसवणूक; एमएमआरडीए अधिकारी असल्याची बनवाबनवी, दोन महिलांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची खोटी ओळख सांगून गरीब नागरिकांना घर देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी नीता सराईकर आणि लक्ष्मी बांडे या दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितांमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी मीरा कांबळे या महिलेच्या तक्रारीवरून प्रकरण उघडकीस आले.

गरीबांच्या घराच्या स्वप्नांचा गैरफायदा

तक्रारदार मीरा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडूपमधील त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मी बांडे हिने कुर्ला आणि कांजूरमार्ग परिसरातील झोपडपट्टीवासीयांसाठी एमएमआरडीएने घरं बांधली असून ती फक्त आठ लाख रुपयांत मिळणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर लक्ष्मीने त्यांची भेट एमएमआरडीएच्या पुनर्विकास प्रकल्पात कार्यरत असल्याचे भासवणाऱ्या नीता सराईकर यांच्याशी घडवून दिली.

नीता सराईकर यांनी स्वतःला एमएमआरडीएची सर्वेक्षण अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यांनी “लवकरच या घरांचा ताबा मिळणार” अशी ग्वाही दिली आणि घरासाठी तात्काळ रक्कम भरण्याचे आवाहन केले. विश्वास ठेवून मीराने स्वतःचं सध्याचं घर १२ लाख रुपयांत विकून, दागिने गहाण ठेवून, वडिलोपार्जित जमीन विकून व कर्ज काढून एकूण ३३ लाख रुपये रोख स्वरूपात नीता सराईकरला दिले.

तीन महिन्यानंतरही ताबा नाही; अन्य लोकांचाही बळी

तीन महिन्यांनंतरही घराचा ताबा मिळाला नाही. वारंवार संपर्क साधूनही सराईकर आणि बांडे विविध कारणं देत राहिल्या. त्यामुळे फसवणुकीची शंका आल्यावर कांबळे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर समोर आले की, नीता सराईकर आणि लक्ष्मी बांडे यांनी याच प्रकारे सुमारे १५ जणांकडून एकत्रितपणे दीड ते दोन कोटी रुपये उकळले आहेत.

पोलीस तपास सुरु

या तक्रारीवरून भांडूप पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या फसवणूक आणि फसवणूक करून विश्वासघात केल्याच्या कलमांतर्गत (भारतीय दंड संहिता ४२० व संबंधित) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस दोन्ही महिलांचा पूर्वेतिहास तपासत असून, अजून काही बळी पडलेले लोक पुढे येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon