अहमदाबाद विमान दुर्घटनेची पुनरावृत्ती; केदारनामध्येही हेलिकॉप्टर दुर्घटना, कॅप्टनसह ७ प्रवासी जळून खाक
योगेश पांडे / वार्ताहर
उत्तराखंड – उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला. केदारनाथ मार्गावर आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये एका २३ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. या अपघातात कॅप्टनचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे ५.३०च्या सुमारास गौरीकुंड परिसरात कोसळले. हेलिकॉप्टर गौरी माई खार्कच्या वरच्या जंगलात पडले. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे.हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जात होते. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे.
गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक जोडपे आणि त्यांची २३ महिन्यांची मुलगी यांचा समावेश आहे.जयस्वाल कुटुंब महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे. तर दोन लोक स्थानिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. विनोद नेगी आणि विक्रम सिंह रावत यांचा समावेश आहे. विक्रम सिंह रावत हे बीकेटीसीमध्ये कर्मचारी होते. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, काशी जयस्वाल, तुस्ती सिंह, विनोद नेगी, विक्रम सिंह रावत आणि कॅप्टन राजीव अशी मृतांची नावे आहेत. अपघातात बळी पडलेल्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याचे सांगण्यात येत आहे.क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे, यामध्ये मृतदेह जळाले आहेत.