मुंबईतील पोलिसांचा तारापूर मधील कारखान्यावर छापा; लाखो रुपयांचा मेफोड्रेनचा साठा केला जप्त
पालघर / नवीन पाटील
मुंबई पोलिसांनी तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकून लाखो रुपयांचा मेफोड्रेन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात ०७ जून रोजी अंधेरी पोलिसांनी फरहान गुलजार खान या संशयित कारचालकाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचे ७१ ग्रॅम मेफोड्रेन (एमडी) साठा जप्त करण्यात आला होता. फरहान खान हा मुंबई पोलिसांचा अभिलेखावरील एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालघर येथील प्रतीक सुदर्शन जाधव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून ०८ लाख ६० हजार रुपये किंमतीचे २१५ ग्रॅम मेफोड्रेन जप्त करून अटक करण्यात आले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली, त्याचसोबत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मेफोड्रेन या अंमली पदार्थांचे बेकायदा उत्पादन करून त्याचा पुरवठा करणारा बोईसर येथील विजय खटके याला ताब्यात घेतले. आरोपी विजय खटके हा रसायनशास्त्र पदवीधर असून तो तारापूर एमआयडीसी येथील “प्रोकेम लॅब फार्मास्युटिकल” या कंपनीत मेफोड्रेन हा अंमली पदार्थ तयार करीत असल्याचा पोलिसांचा आरोप असून त्याच्याकडून ११ लाख २० हजार रुपये किंमतीचे २८० ग्रॅम मेफोड्रेन व कच्चा माल जप्त करण्यात आला.
मेफोड्रेनचे बेकायदा उत्पादन आणि विक्रीमध्ये सामील असलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण ५६६ ग्रॅम वजन असलेले २२ लाख ६६ हजार किंमतीचे मेफोड्रेन, दोन कार आणि सहा मोबाईल असा ३६ लाख ५७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अंधेरी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक महेश गुरव हे अधिक तपास करीत आहेत.