रेल्वे स्थानकावरील फूड, पेपर स्टॉल हटवा, अन्यथा मनसे स्टाईलने हटवली जाणार – अविनाश जाधव
मनसेच्या अविनाश जाधवांचा मध्य रेल्वेला अल्टिमेटम; धडक मोर्चानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी चालत्या लोकल ट्रेनमधून १३ जण खाली पडले होते. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात मध्य रेल्वेविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रेल्वे स्थानकांमधील खाद्यपदार्थ आणि पेपर स्टॉल्स कशाला हवेत? हे स्टॉल आठ दिवसांत काढून टाका. अन्यथा मनसे हे स्टॉल्स उखडून टाकेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी मध्य रेल्वे प्रशासना दिला. रेल्वे प्रशासन आम्हाला तिकीट आणि पास कशासाठी देते? एवढ्या गर्दीत लोकांना प्रवास कसा करायचा? लोक घरी परत येण्यासाठी रिटर्न तिकीट काढतात. मात्र, आता लोकांना घरी येण्याची शाश्वती नसल्याने ते सिंगल तिकीटच काढतील. रेल्वेने कारभार बदलला नाही तर ही परिस्थिती येईल. रेल्वेबाबतच्या सुधारणा एका रात्रीत होत नाहीत. त्यामुळे आता तुम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी काय उपाययोजना ठरवल्या आहेत, ते सांगा, असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला.
प्रत्येक रेल्वे स्थानकात पेपर किंवा वडापावचे स्टॉल कशाला हवेत? डिजिटल युग लोक मोबाईलमध्ये बातम्या वाचतात. आम्ही रेल्वे स्थानकात आल्यावर पाच ते दहा मिनिटांत गाडीत चढतो. त्यामुळे आम्हाला वडापाव स्टॉलची गरज नाही. तुमच्या लोकांना पोसायला काढण्यात आलेले हे टेंडर्स बंद करा. रेल्वे स्थानकातील स्टॉल काढून लोकांना बसायला जागा करा. पुढच्या आठ दिवसांत रेल्वे स्थानकातील हे स्टॉल्स निघाले पाहिजेत. नाहीतर आम्ही ते उखडून फेकून देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. रेल्वे प्रशासन फक्त लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा विचार करते. मेल आल्या की लोकल ट्रेन थांबवल्या जातात. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या ८ हजार लोकांच्या केसेस पेंडिंग आहेत. पाय गमावलेल्या आणि अपघातात जीव गमावलेल्या लोकांबाबत रेल्वेची भूमिका काय आहे? ठाणे रेल्वे स्थानकातील दहापैकी आठ स्वच्छतागृह बंद आहेत. रेल्वे प्रवासी तिकीटाचे पैसे देतात, मग तरीही आम्हाला सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला.