मोबाईल चोरीच्या संशयावरून मित्रांमध्ये रक्तरंजित संघर्ष; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

Spread the love

मोबाईल चोरीच्या संशयावरून मित्रांमध्ये रक्तरंजित संघर्ष; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – वडाळा येथील मोबाईल चोरीच्या संशयावरून दोन मित्रांनी आपल्या तिसऱ्या मित्रावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बकरी ईदच्या दिवशी वडाळा परिसरात घडली. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी रुग्णालयात उपचाराधीन आहे. आसिफ खान, मोहम्मद हसनेन आणि फैजान शेख हे तिघेही अँटॉप हिल परिसरात राहणारे आणि एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने ते परिसरात भेटले असता, आसिफ खान याने आपला मोबाईल दुकानात चार्जिंगला ठेवून विसरला. नंतर मोबाईल सापडला नाही म्हणून त्याने फैजानवर चोरीचा संशय घेतला. या कारणावरून तिघांमध्ये वाद झाला.

सायंकाळच्या सुमारास झालेल्या पुन्हा भेटीत वाद अधिक चिघळला आणि त्या वेळी आसिफ आणि हसनेन दोघांनी मिळून फैजानवर हल्ला केला. या झटापटीत फैजानच्या पोटात चाकू मारण्यात आला, तर आसिफच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. फैजानला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी आसिफही जखमी अवस्थेत उपचार घेत असून, त्याला बरे झाल्यावर पोलिस अटक करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. हसनेनला अटक करण्यात आली असून तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.

या प्रकरणी फैजानचा भाऊ मोहम्मद सुल्तान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, ११५(२), ३(५), ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात वापरलेला चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे मित्रांमधील नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एका साध्या गैरसमजुतीने जीवघेणा संघर्ष उभा राहिला आहे. पोलिस तपास सुरू असून, पुढील कारवाईसाठी साक्षी व पुरावे गोळा केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon