पोलीस बनले देवदूत ! घाटकोपरमधील अरविंद विला दुर्घटना टळली; धाडसी पोलिसांचा सन्मान

Spread the love

पोलीस बनले देवदूत ! घाटकोपरमधील अरविंद विला दुर्घटना टळली; धाडसी पोलिसांचा सन्मान

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई – गेल्या आठवड्यात थोड्या पावसाने मुंबईकरांना उन्हाच्या झळांपासून दिलासा दिला, पण त्याच वेळी घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर असलेली जुनी ‘अरविंद विला’ ही इमारत २७ मेच्या पहाटे सुमारास कोसळली. घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचले ते पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रानवट आणि शरद शेटे, जे त्या वेळी गस्तीवर होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोणतीही मदत न मागवता, अग्निशमन दल किंवा पालिकेची वाट न पाहता, तत्काळ झोपेत असलेल्या कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

ही कारवाई जीवाची पर्वा न करता त्यांनी केली. मात्र, या शौर्यकथेची कुणीही दखल घेतली नाही. मुंबई पोलिस आपल्या प्राणांची बाजी लावत असतो, केवळ जनतेकडून अपेक्षा असते ती थोडीशी शाबासकी आणि मानाच्या स्पर्शाची. ही बाब ओळखून घाटकोपर परिसरातील पत्रकार, समाजसेवक व सजग नागरिकांनी पुढाकार घेत, त्या धाडसी पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. हा गौरव सोहळा घाटकोपर पोलिस बीट कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय गिरी, मुकुंद लांडगे, सकाळचे वार्ताहर निलेश मोरे, सेवानिवृत्त शिक्षक हरिश्चंद्र पाठक आणि अनेक घाटकोपरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस उपनिरीक्षक शरद शेटे यांनी भावनिक शब्दांत सर्वांचे आभार मानले आणि सांगितले की, या प्रेमळ सन्मानामुळे आम्हाला नवी प्रेरणा आणि उभारी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon