भिवंडीतील वेहेळे गावात नाशिक एक्स्प्रेस हायवेवर बेकायदेशीरपणे सुरू आहे आरडी लाऊंज अर्थात रूक्मिणी ढाबा
पब, मद्यविक्री व गैरप्रकाराचा अड्डा म्हणजे आरडी लाऊंज, रुक्मिणी ढाबा अर्थात मानकोली ढाबा
राज्य उत्पादन शुल्काच्या स्थानिक अधिकारयाच्या डोळ्यावर गांधारीरुपी पट्टी, पोलीस प्रशासन देखील अळीमिळी गुपचिळी
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – नाशिक महामार्गावर वेहेळे गावात असलेले आर डी लाऊंज अर्थात रूक्मिणी ढाबा हे ठिकाण सध्या बेकायदेशीर मद्यविक्री, पब पार्टी आणि गैरप्रकारांचे अड्डे म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. बाह्यतः ढाब्याच्या नावाखाली सुरु असलेले हे ठिकाण प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतर सुरू होणाऱ्या तरुणाईच्या मद्यधुंद पार्टीसाठी कुप्रसिद्ध झाले आहे.
रात्री उशिरा ‘बॅकडोअर’ एन्ट्री, आत देशी-विदेशी मद्याची खुलेआम विक्री
बाहेरून दिसणारा एक सामान्य ढाबा, पण आत देशी आणि विदेशी मद्यांची खुलेआम विक्री, नाचगाण्याच्या पार्टी, आणि रात्री उशिरा मागच्या दाराने होणारी एन्ट्री थक्क करणारी आहे. या ढाब्यावर ग्राहकांना मागच्या दरवाजातून प्रवेश दिला जातो. त्यानंतर मेनुकार्ड दाखवून देशी व विदेशी मद्यांची ऑर्डर घेण्यात येते. फक्त मद्यपुरवठा नव्हे, तर पबसदृश वातावरण निर्माण करून स्टेजवर डान्स करण्याची व्यवस्था, लाईव्ह म्युझिक व ऑर्केस्ट्रा अशा विविध सुविधा देखील या ठिकाणी पुरविल्या जातात.
सोशल मीडियावर खुलेआम जाहिरातबाजी, तरुणाईचे आकर्षण केंद्र
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्याची जाहिरात सोशल मीडियावर सर्रास केली जाते. आर डी लाऊंज ठाणे या नावाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेलं हे पेज, पब पार्टी आणि तिकीट विक्रीसारख्या पोस्ट टाकून थेट तरुणाईला आकर्षित करतात. यामुळे अनेक अल्पवयीन मुलेही या आकर्षणाला बळी पडत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर आर डी लाउंजमध्ये अवैध पब, बांधकाम, ढाबा, सोशल मिडिया चा वापर करून मद्य जाहिरात व तरूण व तरूणींना आमिष देऊन व्यसनाधीन बनवणे तसेच सामाजिक व शासकिय नियमांचे उल्लंघन, शासनाचा अबकारी कर बुडवून शासनाची फसवणूक, बार व रेस्टाॅरंट नावाखाली ढाबा व अमली पदार्थांची विक्री, अल्पवयीन मुलांना व्यसनाधीन बनवणे, पहाटे उशिरापर्यंत मद्य विक्री व डान्सबार सदृष्य पब व डांस पार्ट्या आयोजित करून, तिकीटांची विक्री व जाहिरात करणे, सामाजिक शांततेचा भंग व सुसंस्कृत समाज विघातक कार्य करणे, महिलांना व तरूणींना व्यसनाधीनतेच्या विळख्यात ओढणे. किंवा तत्सम जाहिरात माध्यमातून व कृती घडवणे व अवैध दारू विक्री करणे यासारख्या घटना ढाब्यावर घडत आहेत.
कायद्याला हरताळ : प्रशासनाचे आशीर्वाद की दुर्लक्ष?
या संपूर्ण प्रकारामुळे स्पष्ट होते की, या ठिकाणी कायद्याचे खुलेआम उल्लंघन होत आहे. ढाब्याच्या नावाखाली बेकायदेशीर मद्यविक्री, पबसारख्या पार्टींचे आयोजन आणि महसुलाचे नुकसान हे सगळे प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. संबंधित विभागांच्या संगनमतामुळेच हे अड्डे चालू ठेवले जात आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी त्वरित या ढाब्यावर छापा टाकून चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री, आयुक्त महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, उपायुक्त, ठाणे कोकण विभाग, जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा, पोलिस आयुक्त, ठाणे शहर, अँटी-नार्कोटिक सेल (एएनसी), महिला आणि बाल विकास विभाग, ठाणे व राज्य, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य व ठाणे यांना देण्यात आले आहे.