नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी बाळासाहेब पाटील तर पालघर पोलीस अधीक्षक पदी यतीश देशमुख यांची नियुक्ती
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर – पालघर येथील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्या जागी गडचिरोली येथील अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्याकडे पालघरचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. राज्यातील २१ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबतचे पत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिक येथे तर गडचिरोली येथील यतीश देशमुख यांची बदली पालघर येथे करण्यात आली आहे.
बाळासाहेब पाटील यांची पालघर जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या अगोदर कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेत पालघर पोलीस दल प्रथम आले होते. जिल्ह्यात प्रभावीपणे जनसंवाद अभियान राबविण्यात आले. या अभियानाद्वारे बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सायबर चे वाढते गुन्हे लक्षात घेऊन सायबर गाव मुक्त मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यासह पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना संकेतस्थळ अद्ययावत करून युजर फ्रेंडली बनवली, नागरिकांसाठी चॅट बॉक्स सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, एआय अंतर्गत चॅटबोट, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, डिजिटल मॅनेजमेंट सिस्टम, कार्यालयीन कामकाजामध्ये एआय चा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय एप्लिकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या कारकिर्दीत राबविण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या खुनाचे गुन्हे १०० टक्के उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आलेले आहे.