कल्याणमधील इमारत दुर्घटनेनंतर धक्कादायक प्रकार
जखमींना दाखल करुन घेण्यासाठी खाजगी रुग्णालयाची मुजोरी, मागितलं डिपॉझिट
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथे मंगळवार दुपारी सप्तशृंगी या इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. जखमींपैकी एकाला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असता, त्या हॉस्पिटलने सही करा, डिपॉझिट भरा, असे सांगून उपचार करण्यास नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले की, मंगळवारी इमारतीची दुर्घटना घडली त्यावेळी आम्ही त्याठिकाणी पोहचलो. त्याठिकाणी अग्निशमन दलाचे जवान मृतांना आणि जखमींना बाहेर काढत होते. त्या घटनेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांचा आरोप होता की, त्यांचा भाऊ या दुर्घटनेत जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही. त्यांच्या नातेवाईकांकडे सही मागितली आणि डिपॉझिटची रक्कम मागितली, अशी ते तक्रार करीत होते.
आम्ही घटनास्थळी होतो त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काय घडलं याची कल्पना नाही. परंतु काही हॉस्पिटलने दुर्घटनेत जखमी असलेल्या नागरिकांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यासाठी विलंब केला असेल आणि उपचारासाठी दाखल करुन घेतले नसेल तर ही खेदजनक गोष्ट आहे. कल्याणमधील अनेक हॉस्पिटल दुर्घटनेमधील मृत आणि जखमी झालेल्यांना दाखल करुन घेण्यास मज्जाव करतात, अशा हॉस्पिटलवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सचिन पोटे यांनी केली. अशा दुर्घटना झाल्यास जखमींना त्वरित काही न विचारता हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले पााहिजे. यासंदर्भात आयुक्तांसोबत मी चर्चा केली. कल्याण-डोंबिवलीत अनेक खाजगी रुग्णालयाशी महापालिकेने टायअप करुन घ्यावे. टायअप केलेल्या हॉस्पिटलने जखमींना घेण्यासाठी ॲम्बुलन्स पाठवून त्यांना दाखल करुन उपचार केले पाहिजे, अशी मागणी केली असल्याची माहिती सचिन पोटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.