वाहने भाड्याने लावण्याच्या बहाण्याने २० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक; भाईंदरमधील प्रकरणाचा पर्दाफाश, दोन अटकेत

Spread the love

वाहने भाड्याने लावण्याच्या बहाण्याने २० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक; भाईंदरमधील प्रकरणाचा पर्दाफाश, दोन अटकेत

तीन माजी नगरसेवकांचा समावेश, २४६ महागड्या गाड्या जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर – मिरा भाईंदरच्या काशी मीरा पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. एअरपोर्ट आणि जेएनपीटीमध्ये गाड्या भाड्याने लावून दरमहा ५५ ते ७५ हजार रुपये उत्पन्न मिळवून देऊ असे आमिष दाखवून सुमारे १३७५ नागरिकांची तब्बल २० कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी पाच आरोपींचा सहभाग असून हे तिघे माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू राजीव जोशी आणि सचिन सुनील तेटगुरे या दोघा प्रमुख आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींच्या ताब्यातून २४६ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा थार, मारुती ब्रेझा, किया क्रेन्स, बोलेरो पिकअप, अर्टिगा अशा गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची एकूण अंदाजे किंमत जवळपास २५ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. यात मुख्य आरोपी राजू जोशीवर यापूर्वी १३ फसवणुकीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. आरोपी सामान्य नागरिकांना आकर्षक व्यावसायिक योजना दाखवून त्यांच्या नावावर किंवा कंपनीच्या नावावर गाड्या फायनान्स करून घेत असे. काही प्रकरणांमध्ये रोख रक्कम घेतली, तर काही प्रकरणांमध्ये थेट पीडितांच्या नावावर गाड्या फायनान्स करून घेतल्या. विशेष बाब म्हणजे काही पीडितांकडून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३ ते ५ लाख रुपयांची लूटही करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण रकमेचा आणि जप्त गाड्यांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे. काशी मीरा पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. काशीमीरा पोलीस याप्रकरणी अधिक कसून तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon