पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट, शिंदे सेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
बुलढाणा – महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर ५० लाख पकडले तर ते ५० हजार दाखवतात, असे आक्षेपार्ह विधान शिंदें सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर सर्वबाजूंनी टीका करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.
पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला. मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे. एकनाथ शिंदे पण आमचेच आहे. तसेच देवेन्द्रजी आमचे नेते आहे. ते मला याबद्दल बोलले असते तरी काही अडचण नाही. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी माझे शब्द मागे घेतो. या वक्तव्यावर आपण विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करत आहे, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.