पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीतून भरली सरकारची तिजोरी, तब्बल ९.८५ टक्क्यांनी वाढ
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं सत्ताधारी नेत्यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. पण दुसरीकडे सरकारची तिजोरी मद्यावरील करातून मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात २०२४-२५ या गेल्या आर्थिक वर्षात २०२३ – २०२४ च्या तुलनेत मद्य विक्रीत तब्बल ९.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसुली उत्पन्न, गुन्हा अन्वेषण व विविध अनुज्ञप्त्यांवर २०२३-२४ या वर्षापेक्षा भरीव कामगिरी केली आहे. २०२३-२४ मध्ये जिल्ह्याचा महसूल २ हजार ७२९ कोटी ४४ लाख इतका जमा झाला होता. मात्र आता २०२४-२५ मध्ये २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. त्यामुळे यातून सरकारची तिजोरी मालामाल झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये सातत्य राहिले असल्यामुळे पुणे एक्साइजने महसुलात मोठी वाढ केली. दरम्यान अवैध दारुविक्रीला चाप बसल्याने सरकारी उत्पन्नात मद्यविक्रीतून महसुलात वाढ झाली आहे.