घोडबंदर नव्हे, मृत्यूचा सापळा; सोळा महिन्यांत १५ हून अधिक जणांचा अपघाती मृत्यू, कोंडीने चालक त्रस्त
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – घोडबंदर रस्ता प्रवासासाठी खूपच धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर मागील सोळा महिन्यांत १५ हून जास्त जणांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकीस्वार सर्वाधिक असून जखमींची संख्याही जास्त आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या घोडबंदर रोडच्या सध्याच्या स्थितीकडे प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी येथी वाहतूककोंडी दूर करणेही ठाणे वाहतूक शाखेला शक्य होत नाही. वाहतुकीच्या दृष्टीने घोडबंदर रोड खूप महत्त्वाचा असून जेएनपीटी येथून गुजरातच्या दिशेने तसेच इतर विविध ठिकाणांवरून मोठ्या संख्येने अवजड वाहने घोडंबदर रोड मार्गे ये-जा करत असतात. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत घोडबंदर रोड परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागातील नागरीक याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे घोडबंदर रोडवर कायमच वाहनांची वर्दळ असली तरी जीवघेणा ठरू लागला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. काहीवेळेला अपघाताला चालकाची चूक कारणीभूत असली तरी वाहतूक पोलिस, आरटीओ तसेच संबधित रस्ते प्राधिकरण अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
प्रवासासाठी असुरक्षित बनलेल्या या रोडवर २०२४मध्ये आणि जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व अपघात दुचाकींचे असून ट्रेलर, कंटेनर, ट्रक, कारसह अन्य वाहनांनी दुचाकींना धडक दिल्याने त्यामध्ये या सर्वांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बहुतांश अपघातांमध्ये वाहनचालकांनी अपघातग्रस्तांना मदत न करता पलायन केले असून इतर अनेक अपघातांमध्ये अनेजकण जखमी झाले आहेत. याबाबत वाहतूक शाखेतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास विचारल्यानंतर वाहतुकीच्या नियोजनासाठी घोडबंदर भागात आवश्यक मनुष्यबळ तैनात केले आहे. ट्रॅफिक वॉर्डन दिले आहेत. चालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडीपासून खड्डे आणि इतर बऱ्याच समस्या आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी येतो. मात्र हा निधी खर्च केला जात नाही. परिणामी घोडबंदर रोडची दुरवस्था झाली आहे. मेट्रो, उड्डाणपुलाची कामे तसेच घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकाच वेळी सर्व कामे हाती घेतल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने येत्या पावसाळ्यामध्ये खूप समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जस्टीस फॉर घोडबंदर रोड फोरमचे सदस्य गिरीश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. आजही काही ठिकाणी रस्ता खराब आहे. मात्र रस्त्याची डागडुजी व्यवस्थित केली जात नाही. अनेक ठिकाणी रस्ता उंचसखल झाले असल्याने अपघातांचे कारण बनले आहे. सध्या घोडबंदर रस्त्यावर मेट्रोचे काम चालू आहे. उड्डाणपूल उभारले जात असून सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये समावेश करण्याचे काम करण्यात येत आहे. या कामामुळे घोडबंदर रोडवर होणारी वाहतूककोंडी सोडवणे अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक पोलिसांना अशक्य झाले आहे.