भांडुपच्या हिस्ट्रीशीटर जिया अन्सारीने साजरा केला अनोखा ‘गुन्हेगारी’ वाढदिवस, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
मुंबई – भांडुप परिसरातील कुख्यात गुंडा व हिस्ट्रीशीटर जिया अन्सारी, ज्याच्यावर यापूर्वीच खून (भा.द. वि. ३०२), खुनाचा प्रयत्न (भादवि ३०७), खंडणी (भादवि ३८७) आणि गंभीर मारहाण (भादवि ३२६) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने आपला वाढदिवस खळबळजनक आणि धोकादायक पद्धतीने साजरा केला, जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जिया अन्सारीने कापलेल्या वाढदिवसाच्या केकवर त्याने केलेल्या गुन्ह्यांचे भादवि कलम – ३०२, ३०७, ३८७, ३२६ – लिहिलेले होते, आणि शेवटी एक “?” (प्रश्नचिन्ह) टाकून पुढचा गुन्हा कोणता असेल याचा संकेत दिला. या प्रकारानंतर भांडुपमधील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखादा गुन्हेगार उघडपणे आपले गुन्हे अभिमानाने दाखवत असेल आणि पुढील गुन्ह्याची धमकी देत असेल, तेव्हा पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे.
स्थानिक नागरिकांनी मुंबई पोलीस व भांडुप पोलीस ठाण्याकडे मागणी केली आहे की जिया अन्सारी सारख्या धोकादायक गुंडावर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) किंवा तडीपार (हद्दपार) सारखी कठोर कारवाई करण्यात यावी. जर पोलिसांनी वेळेत अशा गुंडांवर कठोर पावले उचलली, तर भांडुपमधील नागरिक अधिक सुरक्षित वाटतील आणि समाजात कायद्याचा वचक टिकून राहील.