१० वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक 

Spread the love

१० वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक 

मुंबई – खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा, मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने गुजरातमध्ये अटक केली. दिनांक १५ एप्रिल २०१५ रोजी नागपाडा पोलीस ठाणे हद्दीतील नया नगर रोड, मामसा स्ट्रीट, मुंबई येथे इसम रियाज इसेन अब्दुल कुरेशी (वय ४४ वर्षे) याचा धारदार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आला होता. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १६४/२०१५ कलम ३०२, ३९७, १२० (ब) भादंवि सह ३७ (१), १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान, मोहम्मद वसिम अक्रम शेख (रा. मोरलँड रोड, मुंबई) आणि साजीद अली आशिक अली चौधरी (रा. खांडिया स्ट्रीट, नागपाडा, मुंबई) यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांचा सहकारी इमरान साबीर शेख हा फरार झाला होता. फरार आरोपी इमरान साबीर शेखचा शोध सुरू असताना तांत्रिक तपासाद्वारे त्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. तो आपले नाव बदलून मोहम्मद राहील मोहम्मद साबीर शेख असे ठेवून मेहसाणा, सिधपूर, गुजरात येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुजरातमध्ये सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहा. पोलीस आयुक्त (डी विशेष) किशोर कुमार शिंदे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव (खंडणी विरोधी कक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स.पो.नि. रामदास कदम, पो.उ.नि. शिरसाट (कक्ष-३), पो.ह. सांगोळे आणि पो.ह. कांबळे (खंडणी विरोधी कक्ष) यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon