एमबीए एमएचसीईटी घोटाळा: ४ आरोपी दिल्लीहून अटक, मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश
मुंबई – महाराष्ट्र राज्य सीईटी सेल, मुंबईतर्फे आयोजित एमबीए एमएचसीईटी आणि इतर शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस आला आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७२ उमेदवारांचा डेटा चोरून, त्यांच्याशी संपर्क साधून आरोपींनी प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी केली जात होती.
आरोपी उमेदवारांना सांगत होते की, ते सिस्टीम हॅक करून परसेंटाइल वाढवू शकतात आणि यामुळे उमेदवार आणि शासनाची फसवणूक केली जात होती. या घोटाळ्याच्या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखा, कक्ष-५ तर्फे आजाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १८/२५, ६१(२), ३१८(४), ३१९(२) बीएनएस आणि आयटी ऍक्टच्या कलम ४३, ६६, ६६(बी), ६६(सी), ७२ अंतर्गत १८/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल क्रमांकांच्या ट्रॅकिंगनंतर दिल्लीहून ४ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचाकडून ५ अँपल मोबाईल फोन, १ अँपल मॅकबुक, १ ब्लूटूथ हेडफोन आणि ६४ जीबीची १ पेनड्राईव्ह हस्तगत करण्यात आली आहे. एमबीए एमएचसीईटी आणि इतर राज्यांतील शासकीय प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहार करून उमेदवारांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त (मध्य) सुनील चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई गुन्हे शाखा, कक्ष-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, महिला पोलीस निरीक्षक सुनिता भोर, सहायक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय बेंडाले, सहायक फौजदार सुजित घाडगे, पोलीस हवालदार मिलिंद निरभवणे, तानाजी पाटील, पोलीस शिपाई गणेश काळे, सरफरोझ मुलाणी, प्रमोद पाटील, महिला पोलीस हवालदार धनवंता भोये, महिला पोलीस शिपाई शुभांगी पाटील, सुप्रिया पाटील, पोशिचा वाघमारे आणि पोशिचा बागल यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.