गुटखा माफियांवर पोलिसांची मोठी कारवाई, मोटार ट्रेनिंग स्कूलमधून गुटख्याचा साठा जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मीरारोड – मीरा रोड परिसरात गुटखा विक्रीचा मोठा अड्डा चालवणाऱ्या माफियावर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ए वन क्लासिक मोटार ट्रेनिंग स्कूल आणि आजूबाजूच्या दोन पानपट्ट्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मीरा रोड परिसरातील रुग्णालये, शाळा आणि रहिवासी भागांमध्ये खुलेआम गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सहज उपलब्ध होत असल्याने पालक आणि सामाजिक कार्यकर्तेही या प्रकाराविरोधात आवाज उठवत होते.
मीरा रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अयुब संदे आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली. छाप्यादरम्यान ए वन क्लासिक मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. यासोबतच परिसरातील दोन पानपट्ट्यांवरही छापे टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला ती जागा म्हणजे एक मोटार ट्रेनिंग स्कूल असल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरत आहे. या ठिकाणी तरुण मुलं वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेत असतात, त्यामुळे अशा ठिकाणी गुटख्याचा मोठा साठा मिळणे ही चिंताजनक बाब आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, महानगरपालिकेने त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.छाप्यादरम्यान पोलिसांना एका घरात देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा सापडला आहे. यावरून स्पष्ट होते की, केवळ दुकानेच नव्हे तर घरांमधूनही गुटख्याची अवैध विक्री केली जात होती. पोलिसांनी हा संपूर्ण साठा ताब्यात घेतला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.