मुलुंड येथील पोलीस परिमंडळ – ७ च्या वतीने अंमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम संपन्न
मुंबई – आजचा युवक हा समाजाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. मात्र, ही युवा पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थ यांच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. प्रमाण कमी करण्यासाठी युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होण्यासाठी मुलुंड विभागातील परीमंडळ -७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ -७ मधील आठ पोलीस ठाण्यात तंबाखू मुक्त शाळा व कॉलेज परिसर ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सदर मोहिमेमध्ये हद्दीतील शाळा व कॉलेज परिसरातील शंभर मीटर अंतरामधील पान टपऱ्यांवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने निष्काषणाच्या तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या टपरयांवर कारवाई करण्यात आली. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील तसेच निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल बाबर यांनी एटीसी पथक व मिल्स स्पेशल यांच्या मदतीने पोलीस ठाणे हद्दीतील १५ शाळा व ३ कॉलेजेस यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना नोटीस देऊन शाळेच्या गेटवर व १०० मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास मनाई असल्याबाबत फलक लावण्याचा सूचना दिल्या. तसेच प्रत्येक शाळा व कॉलेजेस यांना मेन गेट वरती लावण्यासाठी फलक देण्यात आले. १०० मीटर अंतरामधील किराणा मालाचे दुकान यांना तंबाखूजन्य पदार्थ यांची विक्री करण्यास मनाई असल्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या तसेच विक्री करताना मिळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत वरिष्ठांच्या आदेशाने नोटीस देण्यात आली.
सदर मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याकरिता तसेच सामान्य जनतेमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम बाबत माहिती होण्याकरिता ठीक ठिकाणी महिलां तसेच पुरुषांच्या कॉर्नर मिटिंग घेऊन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळांमध्ये एनजीओच्या मदतीने विद्यार्थी तसेच पालक यांच्या बैठका घेऊन त्यांना अंमली पदार्थांच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणाम बाबत माहिती देऊन मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा परिसरामध्ये कोणीही तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा सिगारेटचे सेवन करताना मिळून आल्यास ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. कांजूरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी २०२५ पासून तंबाखूमुक्त शाळा व कॉलेज परिसर ही मोहीम निर्भया पथकाच्या निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल बाबर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात हद्दीमध्ये राबवून जनजागृती केली. पोलीस स्टेशन कडून यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा प्रशासन तसेच पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला तसेच त्यांच्याकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात आले. परीमंडळ ७ मधील घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, भांडुप मुलुंड, नवघर पोलीस ठाण्यांमध्ये २९५ शाळा व कॉलेजमधील परिसर हा तंबाखूमुक्त करण्यात आलेला आहे. परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तंबाखूमुक्त शाळा व कॉलेज परिसर” या मोहिमेला परिमंडळ ७ मधील स्थानिक नागरिक शाळा व कॉलेज प्रशासनाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.पोलिसांच्या या अभिनय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.