५० हजारांची लाच स्वीकारताना लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
गडचिरोली – आदिवासी समाजातील बेरोजगार युवकाला मालवाहू वाहन खरेदीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून कर्ज हवे होते. हे कर्ज मंजूर करण्यासाठी शाखा व्यवस्थापकाच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयातील कंत्राटी कार्यकारी लेखापाल रुपेश वसंत बारापात्रे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सोमवार, १७ मार्च रोजी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चामोर्शी मार्गावरील महामंडळाच्या कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदार हे आदिवासी समाजातील बेरोजगार युवक आहेत. त्यांनी महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर व्यवसायासाठी मालवाहू वाहन खरेदी कर्ज मंजुरीकरिता अर्ज केला होता. या कर्ज मंजुरीसाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यांनी याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापकाच्या नावे पंच- साक्षीदारासमक्ष ५० हजार रुपयांची लाच मागितली. पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात सापळा रचण्यात आला व ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात कलम ७ ७ (अ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत