पालघर पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षित पालघर’ मोहिम; ४०० विद्यार्थी आणि महिला दक्षता समितीच्या सहभागाने प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Spread the love

पालघर पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षित पालघर’ मोहिम; ४०० विद्यार्थी आणि महिला दक्षता समितीच्या सहभागाने प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पालघर – डिजीटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालघर पोलिस दलातर्फे ‘सायबर सुरक्षित पालघर’ मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सायबर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात सोनोपंत दांडेकर कॉलेज, चाफेकर कॉलेज, आय.डी.एल. कॉलेज, सी.एस.पी. कॉलेज, थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयांतील ४०० विद्यार्थी आणि ३३ महिला दक्षता समिती सदस्यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात सहभागी सायबर योद्ध्यांना सायबर गुन्ह्यांची ओळख, गुन्हे घडण्याच्या पद्धती, पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये करावयाची कामगिरी, नॅशनल सायबर क्राईम पोर्टल आणि सी.ई.आय.आर. पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. तसेच, सायबर सुरक्षित पालघर या विषयावर माहितीपट दाखवून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली.

हा कार्यक्रम पालघर पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती संगीता शिंदे अल्फोंसो, परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक अजय गोरड (प्रभारी अधिकारी, सायबर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक रुपाली गुंड, मपोना कविता पाटील, मपोशि मोनिका तिडके, पो.अं. रामदास दुर्गेष्ट, अक्षय शेट्ये, रुपेश पाटील, रोहित तोरस्कर आणि सायबर पोलीस ठाणे, पालघरच्या इतर अधिकाऱ्यांनी केले. या प्रकरणी पालघर पोलीस दलाने नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon