घरगुती वादातून जन्मदात्या आई कडून पोटच्या दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; पतीवरही कोयत्याने वार
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केलेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. कोमल दुर्योधन मिंढे (३०) असे या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यतिल दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली तसेच पतीवरही कोयत्याने वार केलेत. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.
शंभू दुर्योधन मिढे (१) वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे (३) वर्ष अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे (३५) याच्या मानेवर व हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केलं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. जन्मदात्या आईने केलेल्या या क्रुर कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत. आईने आपल्या सोन्यासारख्या मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.