मुंबईतची सुरक्षा ऐरणीवर ! सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता शाहरुख खान अँगल समोर आला आहे; हल्याच्या दोन दिवसापूर्वी मन्नत ची रेकी

Spread the love

मुंबईतची सुरक्षा ऐरणीवर ! सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता शाहरुख खान अँगल समोर आला आहे; हल्याच्या दोन दिवसापूर्वी मन्नत ची रेकी

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर वांद्र्यातील राहत्या घरी झालेल्या प्राणघातक हल्ल्याला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणामधील शाहरुख खान अँगल समोर आला असून मुंबई पोलिसांनीच यासंदर्भातील एक रंजक शक्यता व्यक्त केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीने हा हल्ला कऱण्याआधीच शाहरुख खानच्या घराची रेकीही केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यामध्ये सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या हल्लेखोराने शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची रेकी केल्याची शक्यता असल्याने या दृष्टीकोनातूनही पोलीस तपास करत आहेत. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरातील इतर महत्त्वाच्या सेलिब्रिटींच्या घराबाहेरील हलचालींवर बारीक नजर ठेवली असताना त्यांना शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर १४ जानेवारी रोजी काही संशयास्पद हलचाली आढळून आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्ती लोखंडी शिडीवर चढून शाहरुखचं घर न्यहाळून पाहताना आढळून आली. ‘मन्नत’च्या मागील बाजूला ही ६ ते ८ फुटांची ही शिडी आढळून आली. या संशयास्पद हलचालींमुळे पोलिसांना शंका आली असल्याने त्यांनी आता तपास सुरु केला आहे. या संशयास्पद हलचालींचा सैफ अली खानच्या हल्ल्याशी काही संबंध आहे का याची पडताळणीही पोलीस करत आहेत.

‘मन्नत’मधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली व्यक्तीची उंची आणि शरीरयष्टी ही सैफच्या घराजवळ आढळून आलेल्या संशयित आरोपीशी ताळमेळ खाणारी आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमगे एकच व्यक्ती असल्याची शंका पोलिसांना आहे. तसेच या प्रकरणामधील आरोपी हा एकदा नसल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. ‘मन्नत’च्या मागील बाजूस सापडलेली शिडी ही एकट्या माणसाला उचलता येण्यासारखी नसून ही दोन ते तीन जणांची टोळी असू अशी शक्यता आहे. पोलिसांनी या संशयास्पद हलचालींची चाचपणी केली असली तरी शाहरुख खानने या प्रकरणामध्ये कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. आता ‘मन्नत’ची रेकी करण्यासाठी आणलेली ही शिडी चोरीची तर नाही ना? याचा शोध पोलीस घेत असून हे गूढ उलगडलं तरी पुढील तपास सोपा होऊ शकतो.

सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्रीनंतर राहत्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. सैफ अली खानवर एकूण सहा वेळा वार करण्यात आले. सैफच्या डाव्या हाताबरोबरच मान आणि पाठीवर वार करण्यात आले असून सर्व जखमांपैकी दोन जखमा खोलवर झालेल्या आहेत. शस्क्रीया करुन सैफ अली खानच्या पाठीतून चाकू काढण्यात आल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. सैफची प्रकृती आता स्थिर असून त्याला आठवडाभर आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon