शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट, टिप लागताच पोलीसांनी दोन शिवसैनिकांना घेतले ताब्यात

Spread the love

शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट, टिप लागताच पोलीसांनी दोन शिवसैनिकांना घेतले ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथ शहरातून दोघा शिवसैनिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे अंबरनाथ शहरातील शिवसेनेच्याच दोघा जणांना चौकशीसाठी समन्स बजावलेलां आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून डॉ. बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून २ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चौकशीनंतर शहरातील शिवसेनेच्या २ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मात्र याबाबत अद्याप आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon