पोलीस उपायुक्त अतुल झेंडे ऍक्शन मोडवर; रात्रभर ऑपरेशन ऑल आउट, नशेबाज तरुणांना शिकवला धडा

Spread the love

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे ऍक्शन मोडवर; रात्रभर ऑपरेशन ऑल आउट, नशेबाज तरुणांना शिकवला धडा

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा अमानुष प्रकार कल्याणमध्ये घडल्याने शहर हादरलं. याप्रकणी अटक करण्यात आलेला आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असून त्याला याआधीही अनेक गुन्ह्यांत तुरूंगाची हवा खावी लागल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कल्याणसह संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण असून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक गुन्हे वाढले आहेत, काही दिवांपूर्वी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाणही करण्यात आली होती. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर असून कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचंच ताजं उदाहरण नुकतंच कल्याणमध्ये पहायला मिळालं. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर नशा करणाऱ्या काही तरूणांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. रस्त्यावर नशा करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना फटके देत पोलिसांनी त्यांची रस्त्यातच धीडं काढली. एवढेच नव्हे तर त्यांना भररस्त्यात उठाबशाही काढायला लावत पोलीस उपायुक्त, परिमंडळ – ३, यांनी चांगलाच इंगा दाखवला.

कल्याण परिमंडळ ३ मध्ये महिलांची छेडछाड व रस्त्यावरील नशेबाजांची वाढती समस्या लक्षात घेऊन कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव तसेच कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे याच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवले. रात्री रस्त्यावर नशा करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यापर्यंत रांगेत चालवत फटके देण्यात आले. तसेच, त्यांना उठाबशा काढण्यास भाग पाडले. कल्याण परिमंडळमधील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. कल्याण पूर्व भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा संदेश देण्यात आला असून यामुळे आतातरी गुन्हेगारांना थोडाफार वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon