कल्याण हादरलं ! तीन लग्ने, तीन गुन्हे, बायकोसह नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्य
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याण पूर्व येथील १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी विशाल गवळीने तीन लग्ने केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत. सीसीटीव्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला, ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे. मुख्य संशयित आरोपी विशाल गवळीसह त्याच्या बायकोलाही अटक केली आहे. पोलिसांनी विशाल गवळीची कसून चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळीने एक दोन नव्हे तब्बल तीन लग्न केली होती. त्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत. विशाल गवळी हा अत्यंत मुजोर आरोपी असल्याचं आढळून आलं आहे. अटक केल्यानंतरही त्याची मुजोरी गेली नाही. त्याने व्हिक्ट्रीचं चिन्ह दाखवलं होतं. त्याच्या या विकृतीमुळे सर्वच हादरून गेले आहेत.
कोळशेवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री एका रिक्षा चालकाला अटक केली होती. तर बुधवारी बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला अटक केली. पोलिसांनी या तिघांचीही कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी आहे का? याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गवळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशालवर मालमत्तेशी संबंधित अनेक गुन्हे असल्याचं आढळून आलं आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड आणि लहान मुलांचे लैगिंक शोषण करणे आदी गुन्हे असल्याचंही सांगितलं जात आहे. तो विकृत इसम असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी त्याची माहिती काढली असता त्याने तीन लग्न केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही शोधशोध सुरू केली आहे. आरोपींकडून रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीसह इतर आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तसेच या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाऊन चौकशी केली जाणार असून या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेतला जाईल, असं कल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं.
सीसीटीव्हीत काय दिसले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे. ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती. ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. विशाल हा गेल्या वर्षापासूनच या मुलीला त्रास देत होता. त्याने गेल्यावर्षीच या मुलीला कोळसेवाडी परिसरात गाठून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या मुलीने त्याला प्रतिकार करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. मात्र यावेळी या मुलीची सुटका करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे. अशा नराधमांचा दावा जलदगती न्यायालयात लवकरात लवकर निकाली काढून फाशी दिली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.