वादग्रस्त माजी आयएअस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?

Spread the love

वादग्रस्त माजी आयएअस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – वादग्रस्त माजी आयएअस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिला आहे. यासाठी न्यायालयाने यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते असं कारण दिले आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली घटना ही केवळ एका संस्थेविरुद्धच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध फसवणूक दर्शवते असेही न्यायालयाने नमूद केले. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे, यावरही न्यायालयाने भर दिला. यानंतर न्यायालयाने अटकपूर्व याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आणि खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र धारी सिंह यांनी याचिकेवर निर्णय देताना अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जात असल्याचे सांगितले. याबरोबरच त्यांनी अटकेविरोधात अंतरिम संरक्षण देखील हटवण्यात आले असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. पुढे त्यांनी नमूद केले की प्रथमदर्शनी खेडकर यांच्याविरोधात भक्कम केस होऊ शकते. अशा परिस्थितीत कटाच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता आहे. एका घटनात्मक संस्थेबरोबरच समाजाचीदेखील फसवणूक केल्याचे हे एक अनोखे प्रकरण आहे, असेही त्यांन स्पष्ट केले.

पूजा खेडकर वर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा, २०२२ मध्ये आपल्या अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलीसांचे वकील आणि तक्रारकर्ता संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)च्या वकिलांनी खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेला विरोध केला होता. यूपीएससीकडून वकील नरेश कौशिक आणि वकील वर्धमान कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली. यूपीएससीने जुलै महिन्यात पूजा खेडकर विरोधात कारवाईला सुरूवात केली. यामध्ये खोटी ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षा दिल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलि‍सांनी भारतीय दंड संहिता, महिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मात्र पूजा खेडकरने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon