पोलीसच निघाले भामटे; ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच उपनिरीक्षकासह ५ जण जेरबंद

Spread the love

पोलीसच निघाले भामटे; ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच उपनिरीक्षकासह ५ जण जेरबंद

योगेश पांडे/वार्ताहर 

जळगाव – जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाखात गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला होता. पण पोलिसांचं बिंग फुटताच एका पीएसआय अधिकाऱ्यासह पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित आरोपींना जेरबंद केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या ग्रामसेवकाचं नाव विकास पाटील आहे. त्यांची सचिन धुमाळ नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती. धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले.

यावेळी रेल्वे स्थानकावर पैसे घेण्यासाठी निलेश अहिरे आला. त्याला दोघांनी १६ लाख रुपये दिले. त्याचवेळी घटनास्थळी तीन पोलीस कर्मचारी आले, त्यांनी धाड टाकून पैशांच्या बॅगेसह पैसे तिप्पट करून देणाऱ्या निलेश अहिरेला ताब्यात घेतलं. त्यावेळी धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की, आता पोलीस पैसे घेऊन गेले आहेत. त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही, असं सांगितलं. तसेच पोलीस आपल्यावरच कारवाई करतील अशी भीती दाखवली. परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सगळाच भांडाफोड झाला. पोलीस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते. त्याने ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांच्यांशी संगनमत करत ग्रामसेवकाचे पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचं उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon