शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न देण्याचं आमिष दाखवून संगणक अभियंत्याची तब्बल ७१ लाखांची फसवणूक; रशियन आरोपीला अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पिंपरी,चिंचवड – सोशल मीडिया हे जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, एक्स या ऍपवर आपण दिवसभर ऍक्टिव्ह असतो. पण हेच सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आपल्याला महागात ही पडू शकतात. पिंपरी- चिंचवडमधील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर आलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना शेअर मार्केटच्या ग्रुपमध्ये ऍड करून चांगले रिटर्न देण्याचं आमिष दाखवून तब्बल ७१ लाखांची फसवणूक केली. घटनेप्रकरणी सायबर पोलिसांनी गोवा राज्यातून रशियन आरोपीला अटक केली आहे. आरोपी टोनीच्या माध्यमातून सर्व सूत्र पुण्यात राहणारा आरोपी श्रेयस संजय माने बघायचा त्याला देखील पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रादार हे इन्स्टाग्रामवर रिल्स पाहात होते. रिल्स पाहात असताना त्यांना जाहिरात दिसली आणि कुठलाही विचार न करता त्यावर त्यांनी क्लिक केलं. काही क्षणातच वेगवेगळ्या नंबर वरून शेअर मार्केटच्या व्हाट्स ग्रुपला त्यांना ऍड करण्यात आलं. शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न मिळवून देण्याच आमिष दाखवलं. फेक वेबसाइटवरून शेअर मार्केटचे स्टॉक आणि आयपीओ ट्रेंडिंग करण्यास सांगून ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली. घटनेप्रकरणी संगणक अभियंता असलेले तक्रादार यांनी पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसात धाव घेतली. तक्रार नोंदवण्यात आली. सायबरचे पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या टीमने तपास करण्यास सुरुवात केली. ज्या बँक खात्यात पैसे गेले ते बँक खाते गोवा राज्यात वापरलं असल्याचं तपासात पुढे आलं. सायबर पोलिसांची टीम गोवा येथे गेली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने रशियन आरोपी टोनीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी श्रेयसला आधीच पोलिसांनी अटक केली आहे. श्रेयस हा मित्रांकडून गेमिंगच्या नावाने बँक खाते आणि मोबाईल लिंक घेऊन तो विमानाने गोव्याला जायचा. तिथं टोनीसोबत संपर्क साधून त्याच्याकडून सायबर गुन्हे करवून घेत असल्याचे समोर आलं आहे. गुन्ह्यातील रक्कम दुबई आणि इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे. रशियन आरोपी टोनीचा शोध गुजरात पोलीस देखील घेत होते. प्रकरणी मार्क, श्रेयस आणि टोनी तिघेजण सायबर गुन्हे करत असल्याचं उघड झालं आहे. पैकी, दोघांना अटक करण्यात आली आहे.