जादा व्याजाचे आमिष दाखवून महिलेची ४९ लाखांची फसवणूक, आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

Spread the love

जादा व्याजाचे आमिष दाखवून महिलेची ४९ लाखांची फसवणूक, आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई –  राज्यात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज हजारो नागरिकांना नागवले जात आहे. नागरिक देखील आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. टास्कच्या नावाखाली सांताक्रुझ येथील महिलेची ४९ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद इसरार अब्ररार असे अटक आरोपीचे नाव असून फसवणुकीतील रक्कम आरोपीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला मूळची छत्तीसगड येथील रहिवासी असून सध्या ती मुंबईत वास्तव्याला आहे. एका खासगी कंपनीत ती वरिष्ठ सल्लागार म्हणून कामाला आहे. तक्रारदार महिलेला ९ मार्च रोजी प्रिती शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष तिला दाखविण्यात आले. प्रात्यक्षिक म्हणून तिने तक्रारदार महिलेला गुगलवर जाऊन काही हॉटेलला रेटींग देण्याचे काम दिले होते. त्यानुसार तिने हॉटेल रेटींग दिले. प्रत्येक रेटींगमागे तिला ५० रुपये मिळाले. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली. दिवसभरात व्यवस्थित रेटींग दिल्यास दिवसाला साडेआठ हजार रुपये मिळतील असे प्रितीने तक्रारदार महिलेला सांगून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. काम सोपे असल्याने तक्रारदार महिलेने तिला होकार दिला. त्यानंतर तिने प्रितीच्या सांगण्यावरुन हॉटेलला रेटींग देण्याचे काम सुरू केले होते. त्याबदल्यात तिला पैसे मिळत होते. तिच्या कामावर खुश होऊन प्रितीने तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले. त्यानंतर तिला जास्त कमिशनचे आमिष दाखवण्यात आले. त्यात तिला काही टास्क देण्यात आला होता. या टास्कवर तिला जास्त मोबदला मिळणार होता.

तक्रारदार महिलेने विविध टास्कसाठी ४९ लाख २८ हजार १७५ रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर तिला २९ हजार ७०० रुपये कमिशन देण्यात आले. कमिशनची रक्कम तिच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. मात्र उर्वरित पैशांसह कमिशनची मागणी केल्यानंतर तिला समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने मारिया नावाच्या एका महिलेशी संपर्क साधून पैशांची मागणी सुरू केली. १९ लाख ७० हजार रुपये भरले तर तिचे सर्व पैसे तिच्या बँक खात्यात जमा होतील असे मारियाने तिला सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय दंड सहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यावेळी काही रक्कम दिल्लीतील बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी दिल्लीचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद इसरार अब्ररार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याच बँक खात्यात साडेतीन लाख रुपये हस्तांतरित झाले होते. ही रक्कम त्याने एटीएममधून काढून त्याच्या साथीदाराला दिली. त्या बदल्यात त्याला काही मोबदला मिळाला होता, असे चौकशीत उघड झाले. गुन्ह्यांत त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करणात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon