संभाजीनगर येथील प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू तर दोघे जखमी

Spread the love

संभाजीनगर येथील प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू तर दोघे जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर येथील फुलंब्री जवळील दरी फाटा येथे एका प्लास्टिक साहित्य विकीच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेत तिघे जण जळून ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. ही आग शॉक सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, जखमी दोघांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत नितीन रमेश नागरे (२५), गजानन वाघ (३०) आणि राजू सलीम पटेल (२५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे दोघे जखमी झाले आहेत.

फुलंब्री येथे दरी फाटा भागात राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान असून या दुकानात मोठ्या प्रमाण प्लास्टिक साहित्य भरलेले होते. रविवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉक सर्किट झाले. यामुळे या दुकानाला आग लागली. दुकानात प्लॅस्टिक असल्याने आगीने उग्र रूप धारण केले. यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला. आग लागल्याची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकान मालकांना समजली. यावेळी ते आग विझवण्यासाठी धावले. त्यांनी दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे मोठा स्फोट झाला व वरील तिघे वेगाने बाहेर फेकले गेले. यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीमुळे देखील ते होरपळले. यामुळे नितीन रमेश नागरे, गजानन वाघ, राजू सलीम पटेल या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. हे सर्व फुलंब्री येथील रहिवाशी होते. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. तातडीने अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले व आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेतील मृत गजानन वाघ व जखमी शाहरुख पटेल हे दोघे चांगले मित्र होते. ते होमगार्डमध्ये कार्यरत आहे. तर शाहरुख पटेल याचा मृत भाऊ राजू पटेल याचे हे दुकान होते. ते आग विझविण्या करीता घटनास्थळी गेले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon