तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून फसवणूक; २ कोटी १८ लाखांचा गंडा, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – राज्यात दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलीस नागरिकांना सूचना देऊन सुद्धा नागरिक आमिषाला बळी पडत आहेत. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एकाची फसवणूक केली आहे तसेच बँक खात्यातून मणी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत तब्ब्ल २ कोटी १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबईत घडलेल्या या प्रकारात पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तुमचे बेकायदेशीर पार्सल पकडले आहे तसेच तुमच्या बँक खात्यातुन मनी लॉडरिंग झाल्याचे सांगत आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करण्यासाठी आरोपीनी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया यांचे बनावट लेटर हेडचा वापर केला आहे. हे लेटर हेड पाठवुन फिर्यादींच्या खात्यावरील रक्कम सर्व्हेलंस करीता वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सांगुन तब्बल २ कोटी १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.