वारंवार पाठलाग व लैंगिक छळाला कंटाळून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच सुरु केला तपास, ४ महिन्यांनी आरोपी गजाआड

Spread the love

वारंवार पाठलाग व लैंगिक छळाला कंटाळून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच सुरु केला तपास, ४ महिन्यांनी आरोपी गजाआड

योगेश पांडे/वार्ताहर 

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये १२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ६ जून २०२४ च्या सायंकाळी भोसरी येथील राहत्या घरी मुलीने टोकाचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी पोलीस तपास देखील सुरु होता. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. दुसरीकडे मुलीचे वडील आपल्या मुलीने आत्महत्या का केली असावी? यामुळे अस्वस्थ होते. अखेर वडीलांनीच मुलीला न्याय देण्याचं ठरवलं. अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की हसत खेळत आयुष्य जगणाऱ्या आपल्या मुलीने आत्महत्या केली, याचा तपास सुरु केला. घरात तिला कुणी तिला काहीच बोललं नव्हतं? मग नेमकं असं काय घडलं की तिने येवढं टोकाचं पाऊल उचललं? याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला. यासाठी त्यांनी तिच्या वस्तू आणि कपडे तपासायला सुरुवात केली.

तेव्हा मुलीच्या ड्रेसच्या खिशात त्यांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवर त्यांना एक मोबाईल नंबर आढळला. हा नंबर कुटुंबातील कोणाचाच नव्हता. तिथेच वडिलांना शंका आली. एक पाऊल पुढे जात त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आणि ते तपासले. त्यात त्यांना आढळलं की, दोन मुलं वारंवार मुलीच्या आसपास असल्याचं दिसून आलं. अधिक तपास केला असता हे दोघे क्षितीज पराड आणि तेजस पठारे होते. तपासात क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला. त्यानुसार त्यांनी भोसली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांनीही बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon