मंत्रालयात प्रचंड गोंधळ, संरक्षण जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या, महिला पोलीस अधिकाऱ्याची धावपळ

Spread the love

मंत्रालयात प्रचंड गोंधळ, संरक्षण जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या, महिला पोलीस अधिकाऱ्याची धावपळ

योगेश पांडे/वार्ताहर

मुंबई – मंत्रालयात मंगळवारी पुन्हा एकदा मोठा गोंधळ बघायला मिळाला. काही दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत असलेल्या संरक्षण जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केलं होतं. आदिवासी उमेदवारांची पेसा कायद्याअंतर्गत भरती व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात ते आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचा मुद्दा सर्वत्र चर्चेत राहिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्या आंदोलनावर टीका केली होती. यानंतर तशाच प्रकारच्या आंदोलनाची पुनरावृत्ती मंत्रालयात बघायला मिळत आहे. मंत्रालयात धनगर समाजाच्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी थेट संरक्षण जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केलं. यावेळी मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला. धनगर समजाला आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळावं, अशी मागणी धनगर समाजाच्या आंदोलकांची आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उडी मारुन आंदोलन केलं. आंदोलक राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी उपोषण करायला बसले होते. अखेर ते मंगळवारी मंत्रालयात आले आणि त्यांनी संरक्षण जाळ्यांवर उड्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारी संरक्षण जाळ्यांवर उतरली. तिने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक बाहेर आले. आमचं निवेदन स्वीकारा या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

आंदोलकांना बाहेर काढल्यानंतरही त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळावा, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी यावेळी केली. आंदोलकांनी मंत्रालयातून न हटण्याची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. “आमची मागणी आहे, जीआर काढा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढण्यासाठी मुदत दिली होती. मुदत संपली आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता शेवटची बैठक त्यांनी रद्द केली आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon