चॉकलेटचं आमिष दाखवून नागपुरात ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
नागपूर – चॉकलेटचं आमिष दाखवून एका ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही हृदयद्रावक घटना नागपुरातील पारडी पोलीस ठाण्या अंतर्गत रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या ५ वर्षीय बहिणीसमोर हे सारं घडलं. त्यानंतर त्या नराधमाने त्या ५ वर्षांच्या चिमुरडीला गप्प राहण्यासाठी २० रुपयांची नोट दिली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी विरुद्ध पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याचे रेखाचित्र तयार केले असून तपास सुरू केला आहे. २४ तासानंतरही पोलिसांच्या हाती या नराधमाचा सुगावा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पिडीत ८ वर्षांची मुलगी तिच्या लहान ४ वर्षांच्या बहिणीसोबत घरी एकटी होती. तिचे आई-वडील मजूर असून, घटनेच्या वेळी ते कामावर गेलेले होते. त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील एक आरोपी दुचाकीवरून आला. मुली असलेल्या घरात येऊन मुलीच्या वडिलांची चौकशी केली. त्यांच्या वडिलांचे नाव पुकारत ते घरी आहेत का, अशी विचारणा केली. यावेळी घरात कोणी नसल्याचं लक्षात येताच आरोपीने संधी साधली. त्याने ८ वर्षीय मुलीला खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेला. सायंकाळी मुलीचे आई-वडील घरी पोहोचले असता मुलीने त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला आणि त्यानंतर तिचे आई-वडील तिला पारडी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता दोघांनीही आपण त्याला ओळखत नसल्याचं सांगितले. मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मराठी भाषिक असून त्याने कपाळावर टीळा लावलेला होता. या अंतर्गत पोलिसांनी आरोपीला ओळखण्यासाठी त्याचे रेखाचित्र तयार केले आहे. त्याआधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.