अल्पवयीन मुलींवर जवळच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच
लिफ्टमध्ये १२ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, कचरावेचकाला काशीमीरा पोलीसांकडून अटक
योगेश पांडे/वार्ताहर
वसई– अल्पवयीन मुलींवर जवळच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मिरा रोड येथे १२ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर इमारतीत काम करणार्या कचरावेचकाने लिफ्टमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपी कचरावेचकाला अटक केली आहे. पीडित मुलगी १२ वर्षांची असून ती मिरा रोड पूर्वेच्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. मंगळवारी दुपारी ती शिकवणी वर्गातून घरी परतली होती. लिफ्ट मधून वर जात असताना कचरा वेचक राजेंद्र तुसाबर (५८) हा लिफ्ट मध्ये शिरला आणि त्याने पीडित मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र मुलीने घरी येऊन झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी याप्रकऱणी काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार काशिमिरा पोलिसांनी आरोपी राजेंद्र तुसाबर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कमल ७४ सह पोक्सोच्या कमल ८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.