शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता शित्रेसह अख्ख्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल, ६७ विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याने शिक्षण विभागाचा दणका
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर परिसरात असलेल्या एसबीओए शाळेच्या व्यवस्थापनाने एक दोन नव्हे तर तब्बल ६७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याने शिक्षण विभागाने चांगलाच दणका दिला असून, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता शित्रे हिच्यासह व्यवस्थापनाविरुद्ध मंगळवारी (१० सप्टेंबर) सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हडको एन ११ मध्ये ही वादग्रस्त शाळा असून, कायम वादात सापडलेली असते. पालक, विद्यार्थ्यांच्या तक्रारी सुरू असतात. अखेर शिक्षण विभागाने थेट गुन्हे दाखल केल्याने अशापद्धतीने मनमानी करणाऱ्या अन्य खासगी शाळांच्या व्यवस्थापनांनाही धडकी भरली आहे.
या प्रकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक सचिन शिंदे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, शाळांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रवेश हे आरटीई (बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत होतात. २६ ऑगस्टला बालाजी भोसले व २९ पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, की आरटीई पोर्टलवरून आमच्या एकूण ६७ मुलांचा प्रवेश एसबीओए शाळेत निश्चित झाला असून, आम्ही प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी गेलो असता आमच्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला बोलावून घेतले. मात्र तिने स्वतःला न येता प्रतिनिधी पाठवली. न्यायालयात आमची याचिका प्रलंबित असल्याचे सांगून मुख्याध्यापिकेने शिक्षण विभागाच्या पत्रांना, आदेशाला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने एकूण ६७ विद्यार्थ्यांचे या शाळेचे नुकसान केले. त्यामुळे शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलत थेट या शाळेची मुख्याध्यापिका सुनिता शित्रे हिच्यासह शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.