गतिमान सरकार की मंदगती सरकार ? महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना
रस्ता आणि आरोग्य सुविधेच्या अभावामुळे १६ वर्षीय लाडकी बहिणीला झोळीतून उपचारा साठी नेण्याची वेळ; लाडक्या बहिणीचा रस्त्यातच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत असलेल्या गोमाल या आदिवासी गावातील सोळा वर्षे तरुणीचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सागरी हिरू बामन्या, वय १६ वर्ष असलेल्या मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्या. तिला दवाखान्यात दाखल करायचं होतं, पण रस्ता नसल्याने झोळी करून ग्रामस्थ भिंगार गावापर्यंत पोहोचले. मात्र वाटेतच मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता आणि आरोग्य सुविधेच्या अभावामुळे या मुलीचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाताना मुलीला रस्ता नसल्याने झोळीतून घेऊन जावं लागलं. त्याशिवाय तिच्या मृत्यूनंतरही तिला झोळीतूनच घरी आणावं लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळीमा फासणारी घटना शनिवारी बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावांमध्ये घडली. या गावातील सोळा वर्षे तरुणीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू झाला. सरकार सांगतंय, की लाडक्या बहिणींसाठी सर्व सुख – सुविधा, योजना यांची अंमलबजावणी करत आहेत. परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार ती राहत असलेल्या त्या गावामध्ये होऊ शकला नाही. त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा नाही. एवढंच नाही, तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते देखील नाहीत. अशा अवस्थेत या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झोळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. झोळीमधून मध्ये नेत असताना भिंगार गावापर्यंत पोहोचले. जळगाव जामोद हे गाव थोडं अंतरावर होतं, पण वाटेतच या मुलीचा करुण अंत झाला. मृत मुलीला घरी आणतानाही झोळीत बांधूनच आणावं लागलं. या घटनेचा भीम आर्मी तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, गडचिरोलीमध्येही ५ सप्टेंबर रोजी अशीच घटना समोर आली होती. दोन लेकरांना ताप आल्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तरीही आई-वडिलांनी आरोग्य केंद्र गाठलं. मात्र डॉक्टरांनी मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मुलांच्या निधनानंतरही कोणतीही रुग्णवाहिका न मिळाल्याने आईवडिलांनी १५ किमी चालत, त्यांना खांद्यावर घेत ते गावी परतले होते.